अमरावती - शिवसैनिकांना आधार हवा आहे. संजूभाऊ गेल्यावर आत तुम्हीच आमचे नेतृत्व करा. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बडनेरा मतदारसंघातून तयारी करा, आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या विजयासाठी जीवाचे रान करू, अशा शब्दात आज शिवसैनिकांनी दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रिती बंड यांना विनंती केली आहे.
बडनेरा मतदार संघातील शेकडो शिवसैनिक आज प्रिती बंड यांच्या घरी गेले. १३ डिसेंबर २०१८ ला संजय बंड यांचे निधन झाल्यावर अमरावती जिल्ह्यात शिवसैनिक खचून गेले होते. गत विधानसभा निवडणुकीत संजय बंड बडनेरा मतदारसंघातून अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे आता होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक प्रिती बंड यांनी बडनेरा मतदारसंघातून लढवावी, अशी विनंती शिवसैनिकांनी केली आहे.
आज प्रिती बंड यांच्याकडे शिवसैनिकांनी आपल्या वेदना मांडल्या. आमदार रवी राणा यांचा बडनेरा मतदारसंघात त्रास वाढला आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांना मोठ्या आधाराची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बडनेरा मतदारसंघात युतीच्या उमेदवारापेक्षा कमी मते मिळालीत. यावेळी भाजप-शिवसेनेची युती झाली तर बडनेरा विधानसभा मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे. आपण पुढाकार घ्यावा, आम्ही सर्व शिवसैनिक जीवाचे रान करून तुम्हाला निवडून आणू, अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्यावर प्रिती बंड यांनी सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी विचार करेल, मला थोडा वेळ हवा, असे म्हणाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम देशमुख, राहुल, ललित झंझाळ माँटोडे, नाना नागमोते, आशिष धर्माळे, सुनील राऊत, अनिल नंदांवर, मिथुन सोळंके, गजानन डोंगरे, आशिष दरोकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.