अमरावती - शिवसेना-भाजप युती होणार नाही, असे वाटल्याने अनेकजण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. दोन भगव्यांची युती होताच माढा येथून लढणार नाही, असे जाहीर करून सेनापती पळाला आणि सैन्य पसार झाले, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांनी नेहरू मैदान येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी महायुतीचे प्रवीण पोटे, जिल्हा संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी खासदार अनंत गुढे, प्रिती बंड, सुनील खराटे, तुषार भारतीय आदी दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांनी कितीही आदळआपट केली, तरी अमरावतीत फडकलेला भगवा खाली उतरू शकत नाही. अमरावती माझे आजोळ असून जिंकण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. अमरावतीत लढणारा खासदार हवा आहे, रडणारा नको. आज सर्व जुने नवे शिवसैनिक एका मंचावर आलेत, याचा आनंद होत आहे. संजय बंद आमच्यात नाहीत, याचे दुःख होत असले, तरी वहिनी आज मंचावर आल्या आहेत. मला गहिवरून येत असले तरी सर्व एकत्र आले याचा आनंद होत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज आमच्या विरोधकांच्या डोक्यात केवळ खुर्ची आहे. आता आमची युती घट्ट झाली असून देव, देश आणि धर्मासाठी आमची युती झाली आहे. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून आपली भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करताच 65 एकर जागा न्यासाला मिळत आहे. सर्वोच न्यायालयाने राम मंदिराबाबत मध्यस्थ नेमले आहेत. शिवसेनेमुळे राम मंदिराचा विषय आज समोर जायला लागला आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावावर योजना राबवून गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न लावले. शरद पवार किंवा राहुल गांधी हे कधीही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आले नाहीत. आज विरोधक देशद्रोहाची कलम काढायला निघाले, आम्ही जन्मजात देशप्रेमी आहोत. विरोधकांची ही भूमिका खपवून घेणार नाही. त्यांचा टाकम टोकावरून कडेलोट करू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभेतून जय भवानी जय शिवाजी आशा जोरदार घोषणा झाल्या.