यवतमाळ : उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. संजय राठोड यांच्या मतदार संघात ठाकरे यांचे जोरदार स्वागत कार्यकत्यांनी केले आहे. ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता. यावेळी ठाकरे यांनी संत सेवालाल माहाजांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले आहे.
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण : यवतमाळच्या पोहरादेवीला भेट देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करीत असुन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षांची पळवापळवी : 'पूर्वी पक्ष फुटायचा, आता पक्षांची पळवापळवी करण्यात येत आहे. पक्ष पळवापळवी नंतर आम्हाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरा महाराष्ट्रासाठी, देशासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे कार्यकर्ते आम्हाला सांगत आहेत', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे : विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. तुम्ही याकडे कसे पाहता? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, त्यापलीकडे कोणीही जाता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या चौकटीत राहून विधनसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. जर अध्यक्षांनी तसा निर्णय दिला नाही तर, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे असल्याचे ठाकरे म्हणाले'
भाजपने इतरांवर आरोप करणे थांबवावे : विदर्भ दौऱ्यावर भाजपच्या टीकेबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपवर बोलणे योग्य नाही. भाजपने इतरांवर आरोप करणे थांबवावे. आपल्या घरात बाजरबुणगे घुसून घेत आहेत, त्यांचा संभाळ करावा.” अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.