अमरावती - महापालिकेत अस्तित्वात नसलेल्या कंत्राटी 63 कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासन दर महिन्याला वेतन अदा करत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री कुरवाडे यांनी केला आहे. महापालिकेच्या आमसभेत त्यांनी हा आरोप केला. सभागृह या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मनुष्यबळ अपुरे असल्याने अमरावती महापालिकेत सम्यक आणि स्वस्तिक या दोन संस्थांना कर्मचारी पुरवण्याचा कंत्राट देण्यात आला होता. महापालिकेत द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीचे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. महापालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरवण्याचा हा कंत्राट अनेक दिवसांपूर्वी संपुष्टात आला आहे. नव्या कंत्राटासाठी निविदा काढण्यात आला असूनही वारंवार या संस्थांना मुदतवाढ देण्यात आली, असे कुरवाडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी संबंधित कंत्राटदाराने जितके कर्मचारी लावले आहेत त्यापैकी अस्तित्वात नसणाऱ्या 63 कर्मचाऱ्यांचे वेतन महापलिकेकडून घेतल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा - मदरशातील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : आरोपी व शिक्षिका फिरदोस कोठडीत वाढ
हा मोठा घोटाळा असून या प्रकारचा खुलासा हवा असल्याची मागणीही कुरवाडे यांनी केली आहे. कुरवाडे यांच्या मागणीला शिवसेनेचे गटनेते प्रशांत वानखडे यांनीही दुजोरा दिला. दरम्यान, या प्रकारावर काँग्रेसचे विलास इंगोले आणि बसपाचे चेतन पवार यांनी, ज्या संस्थांचे कंत्राट संपले आहे त्यांना महापालिकेचे काम अडू नये यासाठी मुदतवाढ दिली आहे, असे स्पष्टीकरण दिले. तसेच. संबंधितांना जाब विचारणे किंवा नोटीस बजावणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.