अमरावती : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. आज त्यांच्या हातातून शिवसेना निसटली असून शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. आता पुढचे टार्गेट शिवसेना भवन असून दादर येथील शिवसेना भवन लवकरच एकनाथ शिंदे यांना मिळणार असे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा : अमरावती शहरातील राज्यापेठ उडान पुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारी 2022 ला मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली होती. मात्र, हा पुतळा अनधिकृत असल्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी काढून टाकला होता. या प्रकारामुळे अमरावती शहरात चांगलाच गोंधळ उडाला होता. आज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची तात्पुरती मूर्ती बसवून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली. यावेळी येत्या दोन ते तीन महिन्यात राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली.
उद्धव ठाकरे जवळ उरले केवळ तीन जण : उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेली आहे. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले असून महाराष्ट्रातील 95 टक्के शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता केवळ तीनच शिवसैनिक आहेत. संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे हे तिघेजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असे आमदार राणा म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि अनेक शिवसैनिक हे गुहाटीला गेले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी पन्नास खोके घेतल्याचा खोटा आरोप केला होता. आता एकनाथ शिंदे यांनी 200 कोटी रुपये देऊन निवडणूक आयोगाचा निर्णय स्वतःच्या बाजूने लावून घेतल्याचा आरोप संजय राऊत करीत आहेत. संजय राऊत हे काहीही बरळतात. नवनीत राणा या महिला खासदारावर चुकीचे आरोप करणे. त्यांना हनुमान चालीसा म्हणण्यापासून रोखणे, हे पाप संजय राऊत यांनी केले. महिला खासदाराला त्रास देणारे संजय राऊत हे नामर्द असल्याचा आरोप देखील आमदार रवी राणा यांनी केला.