अमरावती : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री अमरावतीत येत असल्याने अमरावती शहरात शिवसैनिक राणा समर्थक आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याअगोदर हनुमान चालिसा पठणाचे आयोजनाचे पोस्टर्स लावले होते. राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लावलेले पोस्टर शिवसैनिकांनी फाडल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा समर्थकांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत करणारे पोस्टर फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे.
शिवसैनिकांनी फाडले राणांचे पोस्टर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. रविवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांनी लावलेले पोस्टर फाडल्याने तणावाचे वातावरण आहे. तर रवी राणा यांच्या समर्थकांनीही उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडले आहे. त्यांनतर शिवसैनिकांनी रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका : आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताच त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले. उद्धव ठाकरे पावसाळ्यात बेडकासारखे बाहेर पडले आहेत, अशी टीका राणा यांनी केली आहे. दुसरीकडे, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सकाळी 9 ते 2 या वेळेत हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. हनुमान चालीसाला विरोध केल्याबद्दल उद्धव ठाकरे सरकारने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करून १४ दिवस त्यांना तुरुंगात टाकले होते. या फलकावर नवनीत राणा यांचे हिंदू सिंहिणी असे वर्णन करण्यात आले आहे.
शहरात पोस्टरवार : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचे फलक फाडून निषेध केला. शिवसैनिकांनी राणांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाही दिल्या. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे उद्या अमरावतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्याच दरम्यान राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. या पोस्टरमुळे संतप्त शिवसैनिकांनी रोष व्यक्त करीत शहरात लागलेले हे सर्व पोस्टर फाडून फेकले.
राणा समर्थकांनी फाडले ठाकरेंचे पोस्टर : माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लावलेले पोस्ट शिवसैनिकांनी फाडल्यानंतर राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी राजकमल चौकात लावलेले पोस्टर फाडले. शिवसैनिक आणि राणा समर्थकांमध्ये सुरू असलेला हा पोस्टर वार पाहता पोलिसांनी शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.