अमरावती - मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच हे सरकार त्यांच्याच वजनाने कोसळेल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली होती. या टीकेला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले असून देवेंद्र फडणवीस हे सध्या नैराश्यात गेल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
'नैराश्येतून फडणवीसांची टीका' -
ज्याप्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत वर्तवणूक केली, ज्याप्रकारे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणप्रकरणी 'खोट बोल पण रेटून बोल' हा त्यांचा स्वभाव सातत्याने समोर येत आहे. या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना नैराश्य आल्या सारखे वाटते, अशी बोचरी टीका मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
'सरकार पाच वर्षे टीकेल' -
राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असली, तरी राज्यात काही घडामोडी घडणार नसून पाच वर्षे हे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार, असा विश्वासदेखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. दरम्यान काँग्रेसमध्ये एखाद्या वेळेस फेरदबल होऊ शकतात, पण याची मला कल्पना नसल्याचेही त्या म्हणाल्या.
'शेतकऱ्यांसाठी विठ्ठलाला साकळे' -
आज विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. त्यापूर्वी यशोमती ठाकूर यांच्याहस्ते रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत अभिषेक करून पूजन करण्यात आले. यावर्षी कोरोनाचे संकट टळू दे, शेतकऱ्यांना सुख समृद्धी येऊ दे, असे साकडेदेखील यशोमती ठाकूर यांनी विठुरायाकडे घातले आहे. तसेच रुक्मिणीची पालखी ही महत्त्वाची आहे. या पालखीला पुढे नेण्याचे काम आणि तिची परंपरा जोपासण्याचे काम आम्ही करत आहे, असेही ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू