अमरावती Seedbank Initiatives : भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय हे कला आणि वाणिज्य शाखेचे महाविद्यालय आहे. या ठिकाणी असणारे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा संस्थेचे पदाधिकारी डॉ. राजाभाऊ महाजन हे वृक्षप्रेमी असून अनेक वृक्षांच्या माहितीचं भांडार त्यांच्याकडे आहे. (Seedbank in Partwada) परतवाडा पासून जवळच असणाऱ्या मेळघाटातील जैतादेही या गावात असणाऱ्या पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन जामुनकर आणि शिक्षक जितेंद्र राठी यांनी आपल्या शाळेत अनेक प्रकारच्या बियांचे संकलन केले आहे. या दोन्ही शिक्षकांच्या प्रेरणेतून प्राचार्य डॉक्टर एकनाथ तट्टे यांना आपल्या महाविद्यालयात सीड बँक साकारण्याची संकल्पना सुचली. याद्वारे अनेक दुर्मीळ वृक्षांच्या बिया संकलित करून त्या राज्यात जिथे कुठे कोणत्याही वृक्षप्रेमींनी वृक्ष संवर्धनासाठी मागितल्या तर मोफत उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे.
असा आहे उद्देश : मेळघाटातील दुर्मीळ लुप्त होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे हा या सीडबँकेचा मुख्य उद्देश आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी दुर्मीळ होत जाणारे वृक्ष भविष्यात लुप्त होऊ नये, याची काळजी या बँकेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या सीडबँकेमध्ये सर्व मूळ वनस्पती तसंच जंगली वनस्पतींच्या प्रजातींचे बीज संग्रहित केले जाणार आहेत. भविष्यात या बियांच्या साठवणुकीचा वापर केला जाईल. जंगलातील वनस्पती नष्ट होण्याच्या विरुद्ध कार्य करणे तसेच देशी बियाण्यांचा प्रचार प्रसार करणे हा या सीड बँकेचा मुख्य उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. या सीडबँकेमधून वृक्ष लावण्यासाठी बिया नेल्यावर भविष्यात या बियांमुळे वाढलेल्या वृक्षांच्या बिया पुन्हा दुप्पट ते चौपट संख्येत या सीडबँकमध्ये गोळा केल्या जाणार असल्याचे देखील डॉ. एकनाथ तट्टे यांनी सांगितले.
अशी आहे सीडबॅंक : भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात आजपासून सुरू झालेल्या सीडबँकमध्ये गोमटी, मुरमाटी, बकुळ, जटाशंकर, वाकुळ, अजाण, शमी, करसडा, कुंभी, करमाळ, दहिफळस, फेटरा, लाल अंबाडी, नील, जिवंती, मोह, कुमकुम, अर्जुन, शेवगा, मुरळ शेंग, कळलावी, पिंपळ, वड, पुनर्नवा, पळस, काटेसावर, रुई, वाघाटा, अमलतास, सफेद मुसळी, रानजाई, वासनवेल, कटकुळी, कडुनिंब, पाठा, हिरडा, दुधी भोपळा, गाजर आळी, शिरीष अशा अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बिजांचे संकलन करून ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या काळात आणखी अनेक वृक्षांच्या बियांचे मोठ्या संख्येने सीड बँकमध्ये संकलन केले जाणार आहे. प्राचार्य डॉक्टर एकनाथ पट्टे यांच्या मार्गदर्शनात प्रा. सुचिता तुरखडे, प्रा. शारदा निंभोरकर, प्रा. बबलू मासोतकर, प्रा. पूजा घुलक्षे, प्रा. निकिता इंगळे, महेंद्र दंडाळे, निखिल नंदावंशी, अनुज मेटकर हे या सीडबँकचे संपूर्ण काम हाताळत आहेत.
उन्हाळ्यात बीज महोत्सवाचे आयोजन: बीज संकलनाचे महत्त्वाचे काम हे खऱ्या अर्थाने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात करता येते. हाच उद्देश समोर ठेवून यावर्षी उन्हाळ्यात महाविद्यालयात बीज महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील बीज संकलन करणारे अनेक वृक्षप्रेमी परतवाडा येथे येतील. महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर बीज संकलन करणाऱ्यांचे विविध पथक गठीत करून मेळघाटच्या जंगलात वेगवेगळ्या परिसरात त्यांना बीज संकलनासाठी पाठविले जाईल. जे पथक दुर्मिळ वृक्षांची जितके बीज जमा करून आणतील त्यापैकी अर्धे बीज त्यांना महाविद्यालयातील सीडबॅंकला द्यावे लागतील आणि उर्वरित अर्ध्या बिया त्यांना आपल्या भागात नेता येईल. असा हा सर्व कार्यक्रम राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर एकनाथ तट्टे यांनी दिली.
बियांचे होणार मोफत वितरण: सीडबँकचा मुख्य उद्देश हा दुर्मिळ होत चाललेल्या झाडांच्या बिया जंगलातून गोळा करून त्या संकलित करून ठेवणे हा आहे. या बिया पुढे ज्यांना कोणाला आपल्या भागात दुर्मिळ झाडे लावून त्यांचे संवर्धन करायचे आहे त्यांना त्या बिया मोफत दिल्या जातील, असे देखील प्राचार्य डॉक्टर एकनाथ तट्टे यांनी स्पष्ट केले. या सीडबँकला लातूरच्या सह्याद्री देवराईचे सदस्य शिवशंकर चापूले, संभाजीनगर येथील प्रख्यात वनस्पती तज्ज्ञ मिलिंद गिरधारी, मुंबईचे सोमनाथ गुंजाळ यांनी देखील भेट दिली असून विदर्भातील हा एकमेव उपक्रम वृक्ष संवर्धनात भरभराट आणणारा ठरेल असा विश्वास देखील या मान्यवरांनी व्यक्त केला.
हेही वाचा: