अमरावती - भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र आनंदात साजरा होत असताना अमरावतीच्या जुना धामणगाव येथील सरपंच आणि सदस्यांनी पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या मागणीकरता आमरण उपोषण सुरू केले आहे.
अमरावती ते धामणगाव रस्ता रुंदीकरणाचे काम करत असताना ८ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या जुना धामणगाव येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. दरम्यान, ही पाईपलाईन दुरुस्त करुन देण्यात यावी याकरता ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. गेल्या ६ महिन्यांपासून जुना धामणगाव ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य या बाबीचा पाठपुरावा करताहेत. मात्र, ही पाईपलाईन अद्याप नादुरुस्त राहिल्याने अखेर सरपंचासह सदस्यांनी या त्रासाला कंटाळून प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण सुरू केले.
हेही वाचा - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे लोकार्पण; मात्र, चव चाखणे टाळले
पाईपलाईन फुटल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची दुरवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाईपलाईन दुरुस्त करून देण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य विशाल कोळी यांनी दिला आहे.
हेही वाचा - VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप