अकोला - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंती निमित्त सरदार वल्लभभाई पटेल मुद्रा लोन उपलब्ध करून देण्यासाठी एकाच छताखाली राष्ट्रीयीकृत बॅकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो युवकांना न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज केले. ते ओसवाल भवन येथे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप आमदार गोवर्धन शर्मा हे होते. तर मंचावर जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात, मनपा सभापती सतीश ढगे, उपमहापौर राजेंद्र गिरी, जस्मिन सिंग ओबेरॉय, सखावत उल्ला जागीरदार आदी उपस्थित होते. या लोन मेळाव्यात 17 बँका सहभागी झाल्या होत्या.
देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मेळावा यशस्वी ठरेल, असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला.