अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या तासाभरापूर्वीच फुटत आहे. त्या विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्अपवर पाठवल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रकरणातील दोषींची कुलगुरूंनी पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी आज अधिसभेने केली.
तर विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीसमोर आणखी काही ठोस माहिती येताच 8 दिवसानंतर या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली जाणार असल्याचे कुलगुरु डॉ. मुरलीधार चांदेकर यांनी स्पष्ट केले.
अधिसभेच्या बैठकीला सुरुवात होताच डॉ. संतोष ठाकरे यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरद्वारे अभियांत्रिकी शाखेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचा विषय मांडला. कुलगुरूंनी या विषयावर सभेच्या शेवटी चर्चा करू, अशी भूमिका घेतली. मात्र, डॉ. संतोष ठाकरे यांचासह अनेक सदस्यांनी हा विषय गंभीर असून यावरच आधी चर्चा व्हावी, अशी मागणी करताच कुलगुरूंनी आपली भूमिका बदलून पेपरफुटीच्या प्रकरणात चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी गोडे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली होती. याची चौकशी केली असता अच्युत महाराज हार्ट रुग्णालयातील एका व्यक्तीकडून व्हॉटस्अपवर मिळाल्याची माहिती समोर आली होती. तर दुसऱ्या दिवशी रुग्णालयामध्ये सापळा रचून प्रश्नपत्रिका देणाऱ्याचा शोध घेण्याच प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती आलाच नाही.
यानंतर विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी रोहणकार आणि आशिष राऊत याने आधीच प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्या विशिष्ट विद्यार्थ्यांपर्यंत वायरल केल्याचा प्रताप समोर आला होता. या प्रकरणी चौकशी केली त्यावेळी वाशिम येथील संम्मती महाविद्यालयातील कार्यरत गोरे हा व्यक्तीही या सर्व प्रकारात सहभागी असल्याचे समोर आले. या प्रकरणी कुलगुरूंनी चौकशी समिती गठीत केली असल्याचे डॉ. हेमंत देशमुख यांना सांगितले.