अमरावती - संभाजी ब्रिगेडने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदनांकडे प्रशासनचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सततची नापिकी, दुष्काळ आणि शासकीय यंत्रणेची उदासीनता यामुळे शेतकरी ग्रासला आहे. आज शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैसा नाही, गतवर्षी विविध पिकांवर काढलेल्या विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यावर्षी शासनाने जाचक अटी रद्द करून जिल्ह्यात सरसकट पीक विमा मंजूर करावा. शेतकाऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन लाख रुपयांचे कर्ज द्यावे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये द्यावे. रासायनिक खतांची भाववाढ मागे घ्यावी, अशा मागण्यांसाठी घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अभय गावंडे सह रणजित तिडके, संजय ठाकरे, शुभम शेरेकर, सुयोग वाघमारे, गजानन मानकर आदी उपस्थित होते.