अमरावती - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे काम सचिन वाझे यांना दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सोमवारी लोकसभेत याचे पडसाद पाहायला मिळाले. सचिन वाझे यांना वसुलीचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सांगण्यावरून देण्यात आल्याचा गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केल्याने खळबळ उडाली. दरम्यान नवनीत राणांच्या या आरोपांचा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करून खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीच्या जीवावर खासदार झालेल्यानी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा मारू नयेत, अशी टीका करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांना सुनावले आहे.
नवनीत राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा. आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे, ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे. यामुळे संसदेत भूमिका मांडता आली आहे, असे ही रुपाली चाकणकर म्हणाल्या.