अमरावती : ब्रम्हांडातील शिव तत्वाला आव्हान आणि नमस्कार करण्यासाठी रुद्रपूजा केली जाते. या पूजेदरम्यान दूध, दही, गुळ, मध आणि तूप हे पंचामृतातील घटक शिवलिंगावर अर्पण केले जातात. या पूजेमुळे संपूर्ण अस्तित्वाची पूजा पार पडते. वातावरणात शांतता निर्माण करण्यासाठी रुद्र पूजा ही सर्वात शक्तिशाली साधन असल्याचे मानण्यात येते. शिवरात्रीच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. शिवतत्व आणि ऊर्जा अत्यंत सूक्ष्म आहे. कोणत्याही चेतन व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्याचा वापर करणे अशक्य आहे.
असे आहे रुद्रपूजेचे महत्व : त्या ऊर्जेची कृपा आपल्यावर व्हावी, यासाठी शिवरात्रीच्या दिवशी हे शिव तत्व प्रकट होते. या दिवशी रुद्र पूजा केल्याने शिवशक्तीचे दर्शन घडते, अशी मान्यता आहे. विद्यार्थी व्यापारी नोकरदार राजकीय नेते तरुणांना रुद्र पूजेचा लाभ होतो, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हींगचे गजेंद्र गुडधे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. रुद्रपूजा केल्यामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. शांतीचा अनुभव मी, तो, तसेच पितृदोष, ब्रम्हदोष, वास्तुदोष, कर्म दोष कमी होतात असे देखील गजेंद्र गुडघे यांनी सांगितले.
108 औदुंबराचे झाडे लावणार : अमरावती शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर भानखेडा ते कोंडेश्वर या मार्गावर पहाडात वसलेल्या एकूण 23 एकर जागेवर आर्ट ऑफ लिव्हिंगचे आश्रम साकारले जाणार आहे. या परिसरात सकारात्मक वातावरण कायम राहावे, यासाठी एकूण 108 औदुंबराची झाडे लावली जाणार आहे. विशेष म्हणजे औदुंबराची ही सर्व वृक्ष दक्षिण भारतातून आणण्यात आली आहेत.
स्वामी भव्यतेज महाराज येणार : आर्ट ऑफ लिविंगचे सदस्य प्रत्येकी एक वृक्ष दत्तक घेऊन हे वृक्ष पूर्णतः बहरेपर्यंत याची संपूर्ण निगा घेतील, अशी माहिती आर्ट ऑफ लिविंगचे महेश गिरुळकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. अमरावती शहरालगत महाशिवरात्रीनिमित्त आयोजित रुद्र पूजेसाठी बंगलोर येथून दी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वामी भव्यतेज महाराज येणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत रुद्र पूजेचा विधी करणारे इतर महाराज देखील येणार आहेत. 18 फेब्रुवारीला सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान ही पूजा केली जाणार आहे. अशा रितीने अमरावतीत पहिल्यांदाच महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्रपूजा संपन्न होणार आहे.