अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प आहेत. सर्वांच्या मनात कोरोनाची भिती आणि भविष्याची चिंता आहे. अशा परिस्थितीत आपले नातेवाईक जवळ हवेत. आपण आपल्या गावातच बरे असा विचार करून महाराष्ट्रातून अनेक परप्रांतीय मजुरांचे जत्थे परराज्यात जात आहेत. अमरावतीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील मजुरांच्या गर्दीत असेच एक कुटुंब मुंबईवरून उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद(प्रयागराज)कडे निघाले आहे. भविष्याचा विचार आणि कोरोनाच्या धास्तीत या कुटुंबाचा प्रवास सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथील मूळ रहिवासी असणारे दिनेश सिंह हे आपल्या कुटुंबीयांसोबत घरी निघाले आहेत. त्यांचे कुटुंब आणि मुंबईत सोबत असणारे काही नातेवाईक असे एकूण 15 जण मित्राच्या वाहनातून घरी निघाले आहेत. दिनेश सिंह हे गेल्या २० वर्षांपासून मुंबईत ऑटोरिक्षा चालवतात. कोरोनाच्या भीतीने गेल्या तीन दिवसांपूर्वी ते मुंबईवरून निघाले आहेत. अलाहाबादला पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी त्यांना लागेल.
अमरावती येथे महामार्गावर जेवण-पाणी मिळाले आणि लहान मुलांसाठी दूधही मिळाले. महाराष्ट्रातील नागरिकांनी वाटेत अनेक ठिकाणी परप्रांतीय मजूरांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी खाण्याची चांगली व्यवस्था झाली आहे, असे दिनेश सिंह यांनी सांगितले.
मुंबईत सध्या परिस्थिती बिकट आहे. आमची ऑटोरिक्षा घरासमोर उभी आहे. सर्व कामे ठप्प असल्याने गावी जाणे हाच पर्याय आहे. पुढे परिस्थिती सुधारली तर परत येता येईल. मात्र, सध्या घरी जाण्याची ओढ लागली आहे, असे दिनेश सिंह म्हणाले.