अमरावती - सैनिक सेवेतून निवृत्त जरी झाला तरी त्याच्या मनातील देशसेवेची भावना कायम असते, याची प्रचिती अंजनगाव सुर्जी येथील नागरिकांना आली. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देश सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन वीस सेवानिवृत्त सैनिक प्रशासनाच्या मदतीसाठी धाऊन आले आहेत.
संपूर्ण जग कोरोनामुळे भयभीत झाले आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सतत धावपळ करत आहे. लॉकडाऊनमुळे पोलीस यंत्रणेवर फार मोठा ताण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशसेवेसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. त्यानुसार सेवेची भावना मनात ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिकांनी आणि सध्या सुट्टीवर आलेल्या तीन सैनिकांनी कंबर कसली आहे.
हे सैनिक दररोज सकाळी अंजनगाव शहरामध्ये पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या पॉईंटवर नि:स्वार्थपणे, कुठलाही मोबदला न घेता सेवा देत आहेत. सकाळी सात ते बारावाजेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने सैनिकाच्या पोषाखामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. जनतेलाही त्यांच्या या नि:स्वार्थ कर्तव्याचा अभिमान वाटत आहे. संचार बंदीच्या काळात हे सेवानिवृत्त सैनिक पोलिसांसोबत खंबीरपणे उभे आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार राजेश राठोड यांनी या सर्व सेवानिवृत्त सैनिकांचे आणि रजेवर आलेल्या तीन सैनिकांचे कौतुक केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार राजेश वेळोवेळी यांना मार्गदर्शन करत आहेत.