अमरावती - चांदूर बाजार नगर पालिकेचे नगराध्यक्ष रविंद्र पवार यांचे कावीळ रोगामुळे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मागील एक महिन्यापासून ते आजारी होते. तालुक्यात राजकारण व समाजकारणात युवकांची फौज तयार करून आपला ठसा निर्माण करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील जणमाणसात हळहळ व्यक्त होत आहे.
मागील सहा वर्षांपूर्वी रवींद्र पवार हे कर्करोगाच्या आजाराने पीडित होते. परंतु औषध उपचाराने त्यांनी या दुर्धर आजारावरसुद्धा मात केली होती. मात्र, एका महिन्यात त्यांना टायफाईड व नंतर पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कावीळ रोगाने अखेर त्यांचा घात केला. हिप्याटायटीस (सि) या आजारासोबत ते मृत्यूची झुंज देत असताना त्यांनी आपल्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
रवींद्र पवार यांचा अल्प परिचय -
४ वर्षांपूर्वी जनतेतून झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ते नगराध्यक्ष म्हणून निवडूण आले. या दरम्यान त्यांनी अनेक समाजपयोगी कामे मार्गी लावली. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी शहरात आपली ओळख निर्माण केली होती. गेल्या ३० वर्षांपासून अविरत रक्तदानासारखे समाजपयोगी कार्य त्यांनी केले. त्यानंतर भाजप कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष हा प्रवास केला. यादरम्यान नगरसेवक ते विद्यमान नगराध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली.
यादरम्यान गजानन महाराज सेवा समितीचे ते अध्यक्ष होते. जिल्हाभरात संत श्री गजानन महाराजांचे सामूहिक पारायनातून त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात स्थान प्राप्त केले होते. यातूनच ते 2016 च्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीतून विजयी झाले होते.
रवींद्र पवार यांच्या जाण्याने तालुक्यातील राजकारण, भाजपची बांधणी, रक्तदान चळवळ, समाजकारण याची अपरहित हानी झाली आहे. समाज कार्यातील देव माणूस गेल्याने तालुक्यातील जनमानसामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रवी पवार यांच्या निधनाची बातमी समजताच शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.