अमरावती - देशभरात दरवर्षी रामनवमी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु मागील वर्षीपासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी सुद्धा राम मंदीरात शांतता बघायला मिळाली. अमरावती जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमात रामनवमी उत्सव मोठ्या थाटात ९ दिवस साजरा केला जातो. राज्यातील लाखो भाविकांची मांदियाळी या ठिकाणी असते. मात्र मागील वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे रामनवमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी घरूनच रामनवमी साजरी करावी, असे आवाहन आश्रमाकडून करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळखुटा येथे शंकर महाराज यांचे मोठे आश्रम आहे. या आश्रमात दरवर्षी रामनवमी महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तब्बल नऊ दिवस येथे रामनवमी निमित्त किर्तन, प्रवचन, सामाजिक कार्यक्रम ,धार्मिक कार्यक्रम व राम जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव पाहता रामनवमी घरूनच साजरी करा असे, आवाहन आश्रमातील लोकांकडून करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर राम नवमी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आज येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.