अमरावती Ramsetu To Ayodhya Skating : तामिळनाडूतील रामेश्वरम, रामसेतू येथून घनश्याम वालंद (Ghanshyam Walland ) याने पाच नोव्हेंबरला स्केटिंग यात्रेला (Skating Yatra) सुरुवात केली होती. घनश्याम सांगतो की, तामिळनाडूतील मुसळधार पावसात मी स्केटिंग करत निघालो. त्यानंतर कर्नाटकातून महाराष्ट्रात पोहचलो तेव्हा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दिवाळीमध्ये दोन दिवस रस्त्यात सर्व हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते. त्यामुळं बिस्किट खाऊनच दोन दिवस प्रवास केला होता. महाराष्ट्रात मात्र प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं याचा आनंद वाटत आहे.
स्केटिंग यात्रेसोबत आहे कलश : प्रभू श्री राम आपल्या 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला ज्या भागातून परत गेले, त्या सर्व भागातील मूठभर माती तो सोबत असलेल्या कलशमध्ये घेऊन अयोध्येला जात आहे. स्केटिंग यात्रेचा उद्देश हा हिंदू जागृतीसह स्केटिंगबाबत जागृती व्हावी असा असल्याचं घनश्याम वालंद याने सांगितलं.
यापूर्वी वडोदा ते दिल्लीपर्यंत केली यात्रा : देशाचा अमृत महोत्सव पर्वावर वडोदा ते दिल्ली अशी अकराशे किलोमीटर स्केटिंग यात्रा यापूर्वी केली असल्याचं घनश्यामने सांगितलं. त्यावेळी मार्गात येणाऱ्या प्रत्येक हुतात्मा जवानांच्या गावाला भेट देऊन देशासाठी आहुती देणाऱ्या प्रत्येक हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. आता श्रीराम मंदिर बनत असल्याच्या आनंदात मी साडेचार हजार किलोमीटर स्केटिंग यात्रेवर निघालो आहे. जगात यापूर्वी जर्मनीमध्ये आठ हजार सहाशे किलोमीटर स्केटिंग यात्रेचा विक्रम आहे. त्यानंतर आता भारतात मी साडेचार हजार किलोमीटरचा विक्रम नोंदवत असल्याचं देखील घनश्याम वालंदने सांगितलं.
रोज बारा तास स्केटिंग : घनश्याम सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान स्केटिंग यात्रेला सुरुवात करतो, रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान त्याची ही यात्रा थांबते. त्याच्यासोबत त्याचे वडील, भाऊ आणि एक मित्र देखील कार घेऊन सोबत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पायाची नस दबल्यामुळं घनश्यामला थोडा त्रास झाला होता. मूर्तिजापूरला एका दवाखान्यात उपचार केल्यावर पुढच्या प्रवासाला सुरुवात केल्याचं घनश्यामने सांगितलं.
हेही वाचा -