अमरावती - शहर आणि जिल्हा कडाक्याच्या थंडीने गारठला असताना आज (मंगळवार) वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतो आहे. सोमवारी रात्रीपासूनच ढगाळ वातावरण असून आज सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरला असताना १० वाजल्यापासून जोरदार पाऊस कोसळायला सुरुवात झाली.
अमरावती शहरात आज सकाळचे तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून गेल्या ४ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीमुळे सायंकाळी ७ वाजल्यापासूनच रस्त्यावर शुकशुकाट पसरत असल्याचे चित्र आहे. तर, पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसाच्या थंडगार पाण्यामुळे पुन्हा एकदा वातावरण बदलले आहे. तर, पुढच्या काही दिवसात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पावसामुळे बाहेर पडताना स्वेटर घालायचा कि रेनकोट, असा प्रश्न अमरावतीकरांसमोर आता उभा ठाकला आहे.
हेही वाचा - अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बदनामीच्या भीतीने मुलीने घेतले उंदीर मारायचे औषध
हेही वाचा - लॉर्डस हॉटेलला आग, 2 मजले जळून खाक