अमरावती- संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले आहेत. गावखेड्यात प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या गोर गरिबांना, निराधारांनाही याचा चांगलाच फटका बसत आहे. संचारबंदी दरम्यान आपल्या गावातील कुटुंब किंवा कोणीही निराधार व्यक्ती उपाशीपोटी राहु नये, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून पुजदा या गावातील युवक एकत्र आले. युवकांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने धान्य बँकेची निर्मिती केली. धान्य बँकेच्यावतीने गावातील गरजू व्यक्तींना धान्य व जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्याचा अनोखा समाजोपयोगी उपक्रम सुरू केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील पुजदा या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असल्याने उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करणाऱ्यांचे काम बंद आहे. पुजदा येथील हातावर पोट असलेले गोरगरीब मजूर, अपंग,निराधारांना लॉकडॉऊनची कोणतीही झळ बसू नये. कोणीही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये म्हणून गावातीलच सामाजिक जाण असलेल्या दात्यांनी आणि सुशिक्षित युवकांनी, एकत्र येऊन ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन धान्य बँकची निर्मिती केली.
साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या व्यक्ती या धान्य बँकेत आपल्या इच्छेनुसार गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, तूरडाळ, तेल, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू दान देतात. या धान्य बँकेत गोळा झालेले धान्य, वस्तू, भाजीपाला इत्यादी, गरजू व्यक्तीना सामाजिक अंतर राखून वितरित करण्यात येत आहे.
पुजदा येथील तरुण युवकांनी "ग्रामपंचायत सहाय्यता निधी" नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या माध्यमातून गावातील दानदात्यांकडून जवळपास एक लाख रुपयांच्या वर निधी जमा करून गरजूंच्या दैनंदिन प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्यांना पैसेही वाटप करण्यात येते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे मोफत जीवनावश्यक वस्तूंचा व नगदी पैशांचा पुरवठा होत असल्याने हातमजुरी करणाऱ्या गोरगरिब, अपंग व निराधार व्यक्ती समाधान करत आहेत.
संचारबंदी लागू झाली तेव्हा पासून या धान्यबँकेमार्फत जवळपास दोनशेच्यावर कुटुंबांना लाभ मिळाला आहे. एवढेच नव्हे तर हे तरुण गावकऱ्यांना मोफत कापडी मास्क,साबणाचे वाटप करू स्वच्छता जनजागृती करत आहेत.