अमरावती- "देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थकारणावर अवलंबून आहे. सध्या जागतिक पातळीवर मंदीचे सावट असल्याने देशात काहीसे अर्थसंकट आले आहे. असे असले तरी देशाच्या अर्थमंत्री या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत आहेत. जीएसटी कौन्सिलची बैठक घेऊन अर्थमंत्री समन्वय साधून अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज देशाची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी बळकट आहे. मात्र, देशातील नामांकित अर्थतज्ञ हे पंतप्रधान असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले होते," अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केली.
हेही वाचा- 'केबीसी'मध्ये १ करोड रुपये जिंकणाऱ्या बबिता ताडेंचं स्वप्न काय?
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे अमरावतीत आले होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातूरकर उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा पाच वर्षात केलेल्या आपल्या कामांचा आधारावर जनादेश मागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनादेश यात्रेच्या माध्यमातून पाच वर्षात केलेली कामे प्रत्येक शहरात पोहोचून जनतेसमोर सांगितली आहे. एखादा पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत आला की तो थोडासा संथ होतो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आल्यावर शंभर दिवसात देशात अनेक उल्लेखनीय कामे झाली आहेत. जे प्रश्न कधी सुटणार नाहीत असे वाटत होते ते प्रश्न आज मार्गी लागले आहे.
हेही वाचा- ...म्हणूनच 'त्या' सात मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा अन् मुखाग्नी
समान नागरी कायदा तिहेरी तलाक हे प्रश्न सुटले आहेत. देशाच्या एकात्मतेला बाधक ठरणारे जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचे धाडस आमच्या सरकारने केले आहे. 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेची घटक बनली. आज भारतीय अर्थव्यवस्था एक मजबूत अर्थव्यवस्था बनली आहे. सध्या घडीला जे काही प्रश्न उपस्थित झाले आहे ते सर्व प्रश्न आमच्या अर्थमंत्री समन्वयाने मार्गी लावत आहेत, असेही खासदार विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.
अर्थतज्ञ असणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची विचार दृष्टी संपूर्ण देशाने पाहिले आहे. असे असताना आता त्यांना देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास संदर्भात सरकारला काही सूचना द्यायच्या असेल तर त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला हवा. असेही खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले. वेगळा विदर्भात संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आपल्याला यावर काहीच बोलायचे नाही, असे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.