अमरावती - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारकडून पोलीस खात्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना विविध पदके जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सध्या अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सदानंद मानकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
2001 मध्ये बुलडाणा जिल्ह्यामध्ये एका गावात महापूर आला होता. त्या पुरामध्ये अडकलेल्या 12 लोकांना जीवदान देण्यात मानकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे तेव्हा येथील खासदार यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल ही प्रशासनाने घेत त्यांना आता पोलीस पदक जाहीर झाले आहे.
हेही वाचा - ..तर, पुणे आणि नागपूरमध्येही नाईट लाईफचा विचार करू
दरम्यान, प्रशासनाने आणि पोलीस खात्याने माझ्या कार्याची दखल घेतल्यामुळे खरोखर मला खूप अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा बहुमान असल्याचेही मानकर म्हणाले.