अमरावती - जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बडनेरा मतदार संघात यावेळी भाजप शिवसेना युतीचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विशेष म्हणजे सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा आमदार रवी राणा यांना घोषित झाल्याचे मेसेज वेगाने पसरविण्यात आले होते. खुद्द आमदार रवी राणा हे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून मला भाजप-शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगत होते.
हे ही वाचा - रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदार रवी राणा यांना भाजप आणि शिवसेना युतीचा पाठिंबा मिळाला असल्याची माहिती रवी राणा समर्थकांकडून सोशल मीडियावर पसरविण्यात आली. काहींनी तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून प्रीती बंड यांना तिवसा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असून बडनेरा मतदार संघात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे समर्थन अपक्ष आमदार रवी राणा यांना असणार असल्याचे निश्चित झाले आहे. असे सांगण्यास सुरूवात केली होती.
दरम्यान, संध्याकाळी सहा वाजता बडनेरा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेने प्रीती बंड यांना ए.बी फॉर्म दिला अशी अधिकृत माहिती समोर येताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. दिवसभर सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांनी आपले पितळ उघडे पडताच अनेकांनी आपल्या पोस्ट डिलीट केल्या.
हे ही वाचा - 'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'