अमरावती - महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, देशभरातील चाहते, बच्चन कुटुंबियांच्या उत्तम प्रकृतीसाठी देवाकडे साकडं, तर कुणी प्रार्थना करत आहे. दरम्यान, केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या व शाळेत खिचडी शिजविणाऱ्या अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील बबिता ताडे यांनी अमिताभ बच्चन, त्यांचे कुटुंब व देशभरातील कोरोना रुग्ण, या आजारातून सुखरुप बरे व्हावे, यासाठी घरी देवाऱ्यासमोर जप सुरू केला आहे.
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील बबिता ताडे या एका महाविद्यालयात खिचडी शिजविण्याचे काम करतात. त्यांनी मागील वर्षी 'कौन बनेगा करोडपती'च्या कार्यक्रमात भाग घेऊन एक कोटी रुपये जिंकले होते. तेव्हापासून बबिता ताडे या प्रकाशझोतात आल्या आहेत. बबिता ताडे यांच्या संघर्षमय कहाणीचे कौतुक खुद्द अमिताभ बच्चन यांनी केले होते.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, अमिताभ बच्चन यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते कोरोनातून लवकर बरे व्हावे, यासाठी बबिता ताडे यांनी देवाकडे साकडं घालत जप सुरू केला आहे. या दरम्यान कोरोनासारख्या आजारामधून अमिताभ बच्चन हे सुखरूप बरे होतील, असा विश्वास बबिता ताडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - कोरोना काळातही पोटच्या लेकरांना वृद्धाश्रमातील आई वडिलांचा विसर..
हेही वाचा - कोरोना इफेक्ट: अमरावती जिल्ह्यात आता वधू वरासह फक्त 25 जणांनाच लग्न सोहोळ्यात प्रवेश