अमरावती - अमरावतीच्या तिवसा मतदार संघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना निवडणूक लढवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिल्याची माहिती आहे. प्रवीण पोटे यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिला असला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत तिवसा मतदार संघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे प्रविण पोटे असा सामना रंगणार आहे.
हेही वाचा - कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पूरग्रस्त ग्रामस्थांमध्ये खडाजंगी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 10-15 वर्षांपासून जे पारंपरिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसला शह देऊन तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ हा मागील गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या ताब्यात आहे.
हेही वाचा - अमरावतीमध्ये नाल्यात अडकली बस; तब्बल साडेपाच तासानंतर 30 प्रवासी सुखरूप बाहेर
विधानसभा 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा येथे भाजपच्या निवेदिता चौधरी या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर आता 2019 मध्ये सुद्धा 2014 ची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी यशोमती ठाकूर यांना शह देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण पोटे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. तिवसा मतदारसंघात निवडणूक लढण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे प्रवीण पोटे म्हणाले. परंतु, कॅमेऱ्यासमोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. मात्र, पक्षाच्या आदेशाचे पालन करून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिलाय.
आगामी काळात जर प्रवीण पोटे यांनी तिवसा मतदारसंघात निवडणूक लढवली, तर ही निवडणूक यशोमती ठाकूर आणि प्रवीण पोटे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.