अमरावती - शहरात 23 नोव्हेंबर 2017 रोजी घडलेल्या बहुचर्चित प्रतिक्षा म्हेत्रे हत्याकांडात आज जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या हत्याकांडातील आरोपी राहुल बबन भड यास आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
..असे आहे प्रकरण
तीन वर्षापूर्वी 23 नोव्हेंबर 2017 रोजी प्रतिक्षा म्हेत्रे ( वय 24) दुपारी 12.30 वाजे दरम्यान मैत्रिणीसोबत दुचाकीने साईनगर परिसरातील ओंकार मंदिरात गेली होती. मंदिरात देवाचे दर्शन घेऊन मैत्रिणीसोबत दुचाकीने परत निघाली असताना वृदांवन वसाहत परिसरात राहुल भड (वय 24) हा त्यांच्या दुचाकी समोर आला. राहुलने दुचाकी अडविल्याने प्रतिक्षाने गाडी थांबवली. राहुल आणि प्रतिक्षा एकमेकांशी बोलत असताना तिची मैत्रिण बाजूला उभी होती. दरम्यान, राहुलने त्याच्या पाठीवर लटकविलेली बॅग कडून त्यातून चाकू काढला आणि प्रतिक्षावर वार केलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा - पीओपी मूर्तींवर बंदी नको; मूर्तिकारांनी काढला मोर्चा
दरम्यान प्रतिक्षाच्या मैत्रिणीने आरडाओरड केली. रस्त्याने जाणारा एक दुचाकीस्वार मदतीसाठी थांबला. प्रतिक्षाच्या मैत्रिणीने मंदिरातील एका व्यक्तीलाही बोलावून आणले. एक कारचालकही मदतीला थांबला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतिक्षाला कारमध्ये बसवून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
यांनी केला तपास
या प्रकरणातील आरोपी राहुल भड यास राजापेठ पोलिसांनी 25 नोव्हेंबर 2017 रोजी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून अटक केली होती. पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी या प्रकरणाचा सुरुवातीला तपास केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
यांनी केला युक्तिवाद
या प्रकरणात सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी सरकारच्या बाजूने युक्तिवाद केला. एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. 7 पैकी एक साक्षीदार आरोपीच्या बाजूने होता तर सहा जणांनी आरोपीविरोधात साक्ष दिली. प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आज जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांनी निकाल दिला. आरोपी राहुल भड यास आजन्म कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यासह प्रतिक्षाच्या कुटुंबीयांना मदत करण्याची शिफारस जिल्हा स्तरीय समितीकडे केली.
हेही वाचा - तूर खरेदीसाठी सहा केंद्रे; नोंदणी करण्याचे पणन विभागाचे आवाहन