अमरावती - महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असताना भाजपने अजून कोणतीही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. परंतु, धामणगाव रेल्वे मतदारसंघात तीन भाजप नेत्यांना उमेदवारी मिळाल्याचे वेगवेगळे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तसेच हा प्रताप भाजपच्याच अतिउत्साही कार्यकर्त्यांचा असल्यामुळे जिकडेतिकडे चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजून अधिकृत तिकीट जाहीरच झाले नाही. त्यामुळे तिकीट नेमके कोण्याच्या पदरात पडणार हे सांगणे सद्यातरी कठीण झाले आहे.
हेही वाचा -शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?
केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपकडे अनेक इच्छुक उमेदवारांची जत्राच आहे. तोच प्रकार धामणगाव रेल्वे मतदारसंघातसुद्धा पहायला मिळत आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघातुन भाजपचे विधानपरिषद आमदार अरूण अडसड यांचे पुत्र प्रताप अडसड, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास निस्ताने व डॉ. संदीप धवने हे भाजपतर्फे निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. चौघांनीही गुडघ्याला बाशींग बांधून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली. परंतु तिकीट कोणाला मिळणार हे कोणालाच माहिती नाही.
हेही वाचा - अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी
सोमवारी अचानक प्रताप अडसड यांना तिकीट जाहीर झाल्याचे मॅसेज व्हायरल झाले. त्यानंतर तसेच मॅसेज डॉ. नितीन धांडे व शेवटी रामदास निस्ताने यांचेही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या तिनही इच्छुकांचे शुभेच्छांचे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. परंतु तिकीट नेमके कोणाला फिक्स झाले याबाबत मतदार संभ्रमात आहेत. तीनही इच्छुक नेत्यांच्या 'भाजप' कार्यकर्ते आपला 'प्रताप' दाखवत आपआपल्या नेत्यांचे सदर पोस्टर शेअर करताना दिसत आहे. त्यामुळे मतदानापूर्वी सध्या भाजप पक्षामध्येच तिकीटासाठी पक्षांतर्गत निवडणूक पहायला मिळत आहे. पक्षाच्या तिकीटासाठी डॉ. नितीन धांडे व प्रताप अडसड हे दोघे दावेदार मानले जात असले तरी नेमका चेंडु कोणाच्या पदरी पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असले तरी दिवसभर याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर होत आहे ती चुकीची आहे. यामध्ये काहीही अर्थ नसून आमची केवळ बदनामी करण्याच्या हेतूने ही पोस्ट व्हायरल केली जात आहे. तसेच ही काँग्रेसची चाल असल्याचे भाजपचे इच्छुक उमेदवार डॉ. नितीन धांडे यांनी सांगितले आहे.