अमरावती - अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठमोठे रस्ते बनविण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र, अशा स्थितीत ग्रामिण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे ते आमला व पुढे कुऱ्हापर्यंत रस्त्याची पुर्णत: चाळणी झाली आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने विविध अपघात झाल्याची नोंद आहे. मात्र, याकडे चांदूर रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
चांदूर रेल्वे ते कुऱ्हा रस्त्यावर नेहमीच वर्दळ राहत असते. आर्वी, नांदगाव, खंडेव्शवर, कारंजा लाड या हावेकडे जाणारे आणि चांदूर रेल्वे वरून तिवसा हायवेकडे जाणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हा रस्ता कधी दुरूस्त होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, दुरूस्ती, नवीन डांबरी व काँक्रीट रस्ते बनवत असतांना हाच रस्ता अपवाद ठरला आहे. या रस्त्यावरून चारचाकी तर सोडाच दुचाकी वाहने चालविणे अवघड झाले आहे. यावर विविध अपघात झाले असतांनाही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.