अमरावती - लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी आता सभांऐवजी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर जोर दिला आहे. 48 तासानंतर होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर आणि मेळघाट या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 18 लाख 30 हजार 561 मतदार अमरावती मतदार संघात आहेत. पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 33 हजार 444 असून 8 लाख 87 हजार 80 महिला आणि 37 तृतीयपंथी मतदार आहेत.
एकूण 2 हजार मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 8916 शासकीय कर्मचारी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमरावती मतदार संघात 134 मतदान केंद्र हे मेळघाटातील दुर्गम भागात आहेत. यापैकी हतरु, गोलाई आणि हिवखेड हे अतिशय दुर्गम भागात येणारे मतदान केंद्र असून अमरावतीवरून या तिन्ही मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी8 तास लागतात. विशेष म्हणजे ही सर्व दुर्गम मतदान केंद्रे मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या बाहेर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. एकूण 37 मतदान केंद्र हे संवेदनशील असून या ठिकाणी सुष्म निरीक्षक नेमण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
अमरावती मतदार संघात 15 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचे नारळ फोडले. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अमरावतीत सभा झाली. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चव्हाण यांची धारणी, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांची अमरावतीत, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी, सिने अभिनेता गोविंदा आणि सुनील शेट्टी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा अमरावतीत झाली.
आज सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्यावर शहराततील झळकलेले सर्व राजकीय फलक काढण्यात आले. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार 18 एप्रिलची वाट पाहत आहेत.
मंगळवारी सकाळी नवनीत राणा व आनंदराव अडसूळ व वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे या तीन मुख्य उमेदवारांनी अमरावती शहरात प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधला. अमरावती मतदारसंघात थेट लढत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ व आघाडीच्या नवनीत राणा यांच्यात होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांचा जोर होता. आता जाहीर प्रचारावर बंदी आहे. आता दोन दिवसांच्या कालावधीत भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस विभाग तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचा मतदारांना पैशांचे वाटप, दारू यावर ‘वॉच’ राहणार आहे. मतदारांना प्रलोभन वा कोणतीही कृती करता येणार नाही, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. प्रचार बंद झाल्यावर शासकीय यंत्रणा वगळता अन्य कुठेही ध्वनिक्षेपक राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.