अमरावती - एकीकडे अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण कोरोनावर मात करत असतानाच नव्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. बुधवारी नव्याने आढलेल्या कोरोना रुग्णांमध्ये परतवाडा पोलीस स्थानकाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मात्र, संबंधित कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी १ मे पासून पोलीस स्थानकाच्या संपर्कात नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी दिली आहे. तसेच कोरोनाबधित पोलीस कर्मचाऱ्याचे कांडकी गाव सील करून गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती ३ मे रोजी अस्वस्थ झाली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याला परतवाडा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पोलीस कर्मचाऱ्याला, खोकला, ताप, कफ, आदी लक्षणे व पोलीस कर्मचारी असल्याने सुरक्षेच्या अनुषंगाने खासगी डॉक्टरांनी या संदर्भातील माहिती उपजिल्हा रुग्णालय व ठाणेदारांना दिली. पोलिसांची सेवा जनतेच्या संपर्कातील असल्यामुळे खबरदारी म्हणून त्याला तत्काळ अमरावती येथील कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा असल्यामुळे न्युमोनियाची लक्षणे असल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला कोविडमधून जिल्हा सामान्य रुग्णालयात (ईर्वीन) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह घोषित करण्यात आला होता.
दरम्यान, त्यानंतर या पोलीस शिपायाचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील ध्रुव पॅथॉलॉजी व मॉलीक्युलर डायग्नोस्टीक्स लॅबतर्फे एक अहवाल प्राप्त झाला तो कोरोना पॉझिटिव्ह समोर आला. त्यानंतर या पोलीस शिपायावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित पोलीस १ मेपासून परतवाडा पोलीस स्थानकाच्या संपर्कात नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला क्वारंटाईन केले. तसेच कांडली गाव पूर्णपणे सील करून फवारणी करण्यात आली आहे.