अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे वृक्षारोपनासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. झाडाला टीगार्ड लावून या वृक्षांना आपल्या मुला मुलींचे नाव देण्यात आले आहे. ही झाडे जगवून पुढील वर्षी त्यांचा वाढदिवसदेखील महिला साजरा करणार असल्याचे संबंधित महिलांनी सांगितले.
वृक्ष आणि वन याचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी त्यांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी आता प्रत्येकांनी आपली जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण करण्याची गरज आहे. यासाठी लोकचळवळ उभारली जावी, अशी शासनाची इच्छा आहे. त्यामुळे तिवसा येथील त्रिमूर्ती नगर येथील महिलांनी एकत्र येत आपल्या घरापासून वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेत आज आपल्या परिसरात वृक्ष लागवड केली.
यावेळी महिलांनी विधिवत वृक्षांची पूजा केली व वृक्षांना नतमस्तक होत वृक्षांची लागवड करत आपल्या स्वखर्चाने झाडांना टी गार्ड लावले आणि त्यांना आपल्या चिमुकल्यांची नावे दिली. या झाडांना खुशी, काजल, नंदिनी, अंकिता, स्वराज आणि रानु, अशी नावे देण्यात आली आहेत.
आम्ही झाडांना मुला-मुलींची नावे देऊन त्यांच्याकडे झाडे जगवण्याची जबाबदारी दिली आहे. ही झाडे जगवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे महिलांनी सांगितले. तर या झाडांना जगवून पुढील वर्षी या झाडांचा मोठ्या प्रमाणात वाढदिवसदेखील साजरा करू, असे महिलांनी सांगितले.