अमरावती - लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असणारा एप्रिल, मे आणि जून हा काळ खऱ्या अर्थाने फोटो आणि व्हिडिओग्राफरसाठी सुवर्णकाळ असतो. यावर्षी कोरोनाने मात्र लग्नाच्या सर्व महूर्तांवर पाणी फेरल्यामुळे अमरावती शहरात आणि जिल्ह्यातील फोटो व्हिडिओग्राफर्स यांच्या वार्षिक नियोजनावरही पाणी फेरले गेले आहे. वर्षभराच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असताना यातूनच सावरायचे कसे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्यात लग्नसह इतर सर्व सोहळ्याचे फोटो काढणे आणि व्हिडिओग्राफी या व्यवस्यावर जवळपास 10 हजार जणांचे कुटुंब अवलंबून आहे. हा साखळी पद्धतीचा व्यवसाय असून यात फोटो काढणारे, व्हिडिओ घेणारे, त्यानंतर व्हिडिओची प्रोसेसिंग करणे, एडिटिंग करणे तसेच फोटो प्रोसेसिंग, प्रिंटिंग आणि अल्बम तयार करून देणारे, या सर्वांचे हात या व्यवसायात गुंफले आहेत.
वर्षभर चालणारे वाढदिवस, साखरपुडा, स्नेहसंमेलन आदी छोट्या मोठ्या कार्यक्रमातून थोडीफार कमाई करणाऱ्या या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी उन्हाळ्यात मोठ्या संख्येत निघणारे लग्न मुहूर्त म्हणजे जणू दिवाळीच. लग्नाच्या या मोसमात अनेक छोटे व्यवसायिक वर्षभराची कमाई करतात. अनेक बेरोजगार तरुणांना कॅमेरा पकडणे, लाईट पकडणे हे काम मिळते. स्टुडियो चालविणाऱ्यांचाही चांगला व्यवसाय होतो. ग्रामीण भागात शेतीसह व्हिडिओग्राफीचा जोडधंदा करणाऱ्या अनेक तरुणांच्या हाती पैसा येतो. फोटो आणि व्हिडियोग्राफी करणाऱ्या अनेकांच्या घरात दरवर्षी एखादी नवी वस्तू घेणे, मुलांच्या शिक्षणाच्याबाबतीत पैशांचे नियोजन करणे हे सारं लग्नाच्या मोसमावर अवलंबून असते. यावर्षी कोरोनामुळे अनेकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, तर काहींनी शासकीय नियमानुसार कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत लग्न आटपुन घेतले आहे. लग्नाचा बडेजाव नसल्यामुळे मोबाईल कॅमेरातूनच अनेकांनी लग्नाचा हा प्रसंग टिपण्यात धन्यता मानल्याने फोटो, व्हिडिओग्राफर्सचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात या व्यवसायाशी जुळलेले 10 हजार जण असून यापैकी जवळपस 7 हजार जण अमरावती शहरात आहेत. यापैकी एक असणारे अनिल पडिया यांनी बुधवारी दोन महिन्यानंतर आपले दुकान उघडले. लग्नाचा मोसम रिकामा गेला आहे. काही महिन्यांपूर्वी घेतलेली कामे लोककडाऊनमुळे ठप्प होती. आता ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सर्व काही बंद असल्यामुळे आता आम्ही उशिरा प्रिंटिंग देणार म्हणून आमचे पेमेंट देण्यासही ग्राहक उशीर करणार. आमच्यापैकी अनेकांनी खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन कॅमेरा आदी साहित्य घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसतानाही या फायनान्स कंपन्यांची किस्त सुरू होतीच. या कोरोनाच्या संकटात आमच्या व्यवसायातील अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना या संकटातून सहज निघता येईल याची शक्यता कमी असल्याचे अनिल पडिया 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
जय फोटो स्टुडियचे संचालक वैभव दलाल सांगतात, की आमचा व्यवसाय ही एक साखळी असून या साखळीतील फोटो, व्हिडिओग्राफर्स यांच्या हातालाच कुठले काम मिळाले नसल्याने पुढची सर्व साखळीच डिस्टर्ब झाली आहे. सरकारने बँकांना कर्जाच्या हप्त्याचा तगादा लावू नका, असे सांगितले असले तरी खासगी फायनान्स कंपन्यांचा तगादा सुरूच आहे. आताचा हा काळ आमच्यासाठी कठीण आहे असेही वैभव दलाल म्हणाले.
लग्न सोहळा प्रत्येकाच्या आयुषयातील अत्यंत महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे. हा क्षण कायमस्वरूपी जपता यावा यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडणारे फोटो आणि व्हिडिओग्राफर्स प्रचंड अडचणीत सापडले आहेत. संकटावर मात करण्यासाठी आता आशादायी ' क्लिक' ची वाट त्यांना आहे.