अमरावती - तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावातील घरात रोही शिरला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रोह्यांच्या कळपाच्या मागे कुत्रे लागल्याने हा रोही घरात शिरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जंगलातून गावाच्या दिशेने रोह्यांचा कळप आला होता. मात्र या रोह्यांच्या मागे गावातील कुत्रे लागले. यातच या कळपातील एक रोही लोकवस्तीतील दीपक सहारे यांच्या घरात शिरला. यावेळी घरातील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. नागरिकांनी बाहेरुन दरवाजा लावून ही माहिती चांदुर रेल्वेच्या वनविभागाला दिली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन रोह्याला तीन तासानंतर घरातून बाहेर काढून जंगलात सोडून दिले. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.