अमरावती - दोन महिन्यांपूर्वी भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला स्थानांतरित करण्यात आले. हेच कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तहसील कार्यालय पुन्हा अमरावतीत आणण्याची मागणी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ठाकूर यांच्या निषेधार्थ भातकुलीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलन केले.
25 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती शहरात असणारे भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याचे आदेश शासनाने पारित केले. यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा आणि नागरिक मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अडीच दिवसांच्या शासन काळात भातकुली तहसील कार्यालय अमरावती येथून भातकुलीला नेण्याचा आदेश शासनाने पारित केला होता.
हेही वाचा - लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'
दरम्यान, भातकुली शहर जिल्ह्याच्या एका टोकावर आहे. त्यामुळे भातकुली तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांना तहसील कार्यालय हे भातकुलीऐवजी अमरावती असलेलेच सोयीचे आहे. या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत अनेक गावातील रहिवाशांनी निवेदन सादर केले होते. आता भातकुली तहसील कार्यालय पुन्हा एकदा दापोली येथून अमरावतीत हलवण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे भातकुली येथील रहिवाशांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध नोंदवला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत आले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही भातकुली येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना भातकुलीच्या नागरिकांनी निवेदनही सादर केले आहे.