अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 597 रुग्ण सापडले तर, चार कोरोना बधितांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. असे असले तरी नागरिक मात्र, बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या इतवारा भाजी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने नागरीक खरेदी करण्यासाठी येतात. परंतु यात अनेक नागरिकांच्या व दुकानादारांच्या तोंडाला मास्कच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचे गंभीर्य नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी जनता कर्फ्यू -
अमरावती जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 27 हजारांवर गेली आहे. मागील आठ दिवसात यात झपाट्याने वाढ होत असल्याने पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात शनिवारी रात्री आठ वाजतापासून ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यामधे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.