अमरावती - एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक मार्गावरील बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांना तासनतास बस स्थानकावरच तात्काळ राहावे लागत आहे. दिवाळी असल्याने प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासह अमरावती शहरात राजापेठ आणि बडनेरा अशी तीन बस स्थानके आहेत. यापैकी बडनेरा येथील अमरावती बस स्थानक क्रमांक दोन येथील कर्मचाऱ्यांनी आज पासून संप पुकारला आहे. हे बस स्थानक भाऊबीजेच्या दिवशी बंद झाले आहे. रेल्वेगाडीने मुंबई, पुणे येथून बडनेराला येणाऱ्या अनेक प्रवाशांना बडनेरा बस स्थानकावरून यवतमाळकडे जाणाऱ्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. राजापेठ बसस्थानकावरून यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, पुण्यासाठी गाड्या सुटतात. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या बस स्थानकावर तासाभरातून एखादी गाडी येत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी बसस्थानकावर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-आता एसटी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, मंत्रालयासमोर करणार आंदोलन - गोपीचंद पडळकर
गाड्यांची अवस्था ही खराब
राजापेठ बस स्थानकावर दुपारी बारा वाजता येणारी नागपूर-अमरावती व नागपूर बुलढाणा ही गाडी आज दीड वाजता पोहोचली. दीड तास उशिराने आलेल्या या गाडीत बसण्यासाठी खामगाव आणि बुलढाण्याच्या प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रवाशांनी गाडीत कशीबशी जागा मिळाल्यावर चालक आणि वाहक यांनी टायर पंक्चर असल्याचे सांगून प्रवाशांना खाली उतरून दिले. यानंतर ही गाडी दुरुस्त करण्यासाठी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात नेण्यात आली. शुक्रवारीसुद्धा बुलढाणाकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी बंद होत्या. तीन वाजण्याच्या सुमारास चांदुर रेल्वे बुलढाणा ही गाडी राजापेठ बस स्थानकावर आली. प्रवाशांनी खच्चून भरून निघालेली ही गाडी अर्ध्या रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याची माहिती प्रवाशांच्या नातेवाईकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप सुरूच; राज्यातील 55 एसटी डेपो बंद!
आरक्षणाची सुविधाही ठप्प
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गर्दी असल्यामुळे जागा आरक्षित करून अनेकजण प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत. अनेक प्रवाशांना आरक्षणाची सुविधा ठप्पा असल्यामुळे त्रास करावा लागला. राजापेठ बस स्थानकावर अकोला, औरंगाबाद, बुलढाणाकडे जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गर्दीतूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे न्यायालयाचे आदेश -
सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारला तुमच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आपापसात चर्चा करून ताबडतोब निर्णय कळवण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.