अमरावती - कोरोनामुळे सारे काही विस्कटले असताना या परिस्थितीत मुलांचा अभ्यास दिवसाला दोन तास ऑनलाईन घेतला जातो. याचा विचार करून शाळेने शुल्कमाफी करायला हवी होती. मात्र, फी साठी तगादा लावून शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणे बंद करणे हा अन्याय आहे. शाळेने यावर्षी केवळ अर्धेच शुल्क वसूल करावे, अशी मागणी पोद्दार शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यध्यापकांकडे आज(सोमवार) केली.
पोद्दार शाळेत यावर्षीचे शुल्क 50 हजार असून दरवर्षी शुल्कात 10 टक्के वाढ केली जाते. कोरोनामुळे यावर्षी ऑनलाईन शिक्षण दिले जात असताना शाळा प्रशासनाने शुल्कासाठी तगदा न लावता यावर्षी शुल्कात 50 टक्के सूट मिळावी या मागणीसाठी सोमवारी अनेक पालक शाळेत धडकले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी दालनाबाहेर येऊन पालकांशी संवाद साधला. यावेळी काही पालकांनी सध्या शाळा बंद असल्याने वीजबिलासह आदी खर्च कमी झाले आहेत. तसेच, कोरोनकाळात अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले असल्याने शाळेने शुल्कामध्ये सूट द्यायला हवी. मात्र, शुल्क भरले नाही म्हणून मुलांना ऑनलाईन क्लासच्या बाहेर काढण्याचा प्रकार संतापजनक असल्याचे पालकांचे म्हणणे होते.
नर्सरी, केजीसह पहिली आणि दुसरीच्या विद्यर्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षणामुळे काहीही कळत नसल्याचे पालकांचे म्हणणे होते. यावेळी मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी शाळेचे भाडे देण्यासह इतर अनेक बाबी असल्यामुळे शुल्क घेतले जात आहेत, असे सांगितले. असे असले तरी पालकांनी शुल्कासंदर्भात दिलेले पत्र व्यवस्थापन मंडळासमोर ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रवींद्र पकडे, सुनील इंगळेसह नरेंद्र वानखडे, यामिनी पाटील, विनोद बोंडे, नेत्रा सोलव, स्मिता राऊत, सरिता शर्मा, गणेश पानझडे आदी पालक उपस्थित होते.
हेही वाचा - अमरावती: विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप