अमरावती- शहरात पांडुरंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू झाल्यावर या महोत्सवाला सुरुवात होते. माजी आमदार रावसाहेब शेखावत मित्रमंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पांडुरंग महोत्सवासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथून विठ्ठल-रुक्मिणीची उत्सव मूर्ती आणण्यात आली आहे. या उत्सव मूर्ती घेऊन पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे भागवताचार्य बाळासाहेब बडवे अमरावतीत आले आहेत. गुरुवारी कॉटन ग्रीन कॉलनी येथील महादेव श्रीनाथ यांच्या घरी धान्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. आज कॉटन ग्रीन कॉलनी येथील विठ्ठल मंदिरातून पंढरपूर येथील उत्सव मूर्ती टाळ, मृदुंगाच्या नादात मिरवणुकीसह गाडगेबाबा समाधी मंदिरापर्यंत आणण्यात आल्या.
गाडगेबाबा समाधी मंदिरस्थळी उभारण्यात आलेल्या सभामंडपात उत्सव मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. पंढरपूरला ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या पूजनाचे सर्व सोपस्कार होतात तसे सर्वच सोपस्कार अमरावतीत आयोजित पांडुरंग महोत्सवात पूर्ण केले जाणार आहेत. अशी माहिती रावसाहेब शेखावत यांनी दिली. 4 ऑगस्टला महाप्रसादाचा कार्यक्रम केला जाणार असून, 5 ऑगस्टला उत्सव मूर्ती आणि पादुका श्री क्षेत्र कौडण्यावरला जाणार आहेत. अमरावतकरांनी पांडुरंग उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन रावसाहेब शेखावत यांनी केले.