अमरावती- धामणगाव रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जुनाट झालेली यूपीएस सिस्टिम न बदलल्याने सिस्टीमने अचानक पेट घेतला. त्यामुळे मागील चार दिवसांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना व कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेती कामांच्या वेळेस शेतकऱ्यांना देखील कर्जापासून वंचित राहावे लागत आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील मुख्य बाजारपेठेत गांधी चौकात सेन्ट्रल बँकेची शाखा आहे. या बँकेत तालुक्यातून आलेल्या काही गावातील शेतकऱ्यांचे कृषी कर्ज प्रकरणे आहेत. शिवाय अनेक गरजू व वृद्धांचे श्रावणबाळ, संजय गांधी योजनांचे अनुदान सुद्धा याच बँकेत जमा होते. बँक सुरु झाली तेव्हापासून या बँकेत यूपीएससी सिस्टीम बदलण्यात आली नव्हती. त्यामुळे मागील वर्षात यापूर्वी देखील बँक बंद ठेवावी लागली होती. 11 ऑक्टोंबर रोजी बँकेचे यूपीएस सिस्टम जळाले तेव्हापासून बँकेचा कारभार बंद असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. त्यात यूपीएस सिस्टिम जळाल्याने इतर मशीन सुद्धा निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच सिस्टीम अद्यावत केले असते तर मागील चार दिवसांपासून ग्राहकांना त्रास सहन करण्याची वेळ आली नसती.