अमरावती - दोघे पती-पत्नी... पती सैन्यात अधिकारी तर पत्नी महाविद्यालयात प्राचार्य.. दोघेही २३ वर्षांपूर्वी नोकरीतून सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शनची रक्कमही मोठी आहे. एवढे सारे असताना कोणी शेतीकडे वळणार का असा प्रश्न कुणी विचारला तर तुम्ही नाही म्हणणार..पण अमरावतीमधील ८० वर्षांचे एक तरुण जोडपे विषमुक्त शेती करत आहेत.
सेवानिवृत्त सैनिक अधिकारी असलेले विजय देऊसकर व त्यांची पत्नी वर्षा देऊसकर हे शेतात सर्वप्रकारचा भाजीपाला, धान्य व फळे घेतात. सर्व भाजीपाला व फळे घेण्यासाठी ते कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. गाईच्या गोमूत्र आणि शेणापासून तयार केलेल्या द्रव्याची ते फवारणी करतात. त्यामुळे हे पीक विषमुक्त असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे या फळांसह भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. घरी लागणारे सर्व प्रकारचे मसाले, भाजीपाला फळे या शेतातच घेतात. हे सर्व काम करायला पत्नी वर्षा देऊसकर यांची त्यांना साथ मिळते.
हेही वाचा-अतिवृष्टीमुळे डाळिंबाला कोट्यवधीचा फटका, यंदा 100 ऐवजी केवळ 2 कंटेनरची निर्यात
हे दाम्पत्य दररोज सकाळी 11 वाजता शेतात येतात. शेतातील सर्व कामाचा आढावा घेतात. काही काम मजुरांकडून काम करून घेतात. फवारणी कशी करायची, पाणी केव्हा द्यायचे, पिकांचे नियोजन कसे करायचे याची जबाबदारी विजय देऊसकर पाहतात. तसेच खत केव्हा टाकायचे व पिकाची मार्केटिंग कशी करायची याचीही जबाबदारी देऊसकर पाहतात.
हेही वाचा-टोमॅटोची जाग्यावरूनच होतेय विक्री; शेतकऱ्याला मिळतोय भरघोस नफा...!
दाम्पत्याने वयाचे 80 वर्ष गाठले असले तरी त्यांच्यामध्ये शेतीविषयी असलेले प्रेम सध्याच्या तरुणांनाही लाजवणारे आहे. शेतीमध्ये दिवसभर राबत असल्याने आरोग्यही चांगले राहते. या वयातही कुठलेही उपचार घेण्याची गरज भासत नसल्याचे वर्षा देउसकर सांगतात. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे त्यानंतर घरी राहून नातवंडात राहणारे अनेक आजी-आजोबा असतात. परंतु सेवानिवृत्तीनंतरही कामाला राम मानणारे देऊस्कर दाम्पत्य आहे. त्यांनी सुरू केलेली विषमुक्त शेती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरू लागली आहे.