अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. हाता तोंडाशी आलेला संत्र्याचा आंबिया बहार गळून पडत आहे. त्यामुळे संत्र्याचे बगीचे मोकळे झाले आहेत. पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज (बुधवारी) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.
गेल्या तीन वर्षांपासून संत्र्याला बाजारभाव नाही तसेच चांगली बाजारपेठही नाही. कर्ज काढून पिकवलेल्या संत्र्याचे नुकसान झाले. मात्र, कृषी विभागाचे अधिकारी मात्र फिरकलेच नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत. रोज शेतात आले की, गळलेला संत्रा उचलण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. या नुकसान झालेल्या संत्र्याचे सर्वेक्षण करायला अधिकारी येईल आणि थोडी फार मदत होईल, या भाबड्या आशेने ते अधिकाऱ्यांची वाट पाहतात. परंतु, अधिकारी मात्र शेताकडे फिरकतच नाही.
शेतकऱ्यांनी तिवसा तहसीलदार रवी महाले यांना निवेदन दिले. नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून संत्रा गळतीवर उपाययोजना करावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात शेतकऱ्यांनी केली. लवकरात लवकर संत्रा बागांचे सर्वेक्षण करून मदत घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.