अमरावती - जिल्ह्यातील शहानूर धरण पूर्णतः भरल्याने शुक्रवारी धरणाचे ४ ही दरवाजे उघडण्यात आले. यामुळे शहानूर नदीतील पाणी पातळीत वाढ होऊन कातखेडा येथील मातीचा बंधारा फुटला आणि दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात पाणी शिरले. यावेळी एक व्यक्ती या नदीत वाहून गेला. राहुल चंदूरकर असे या व्यक्तीचे नाव आहे.
मागील ४ दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे शहानूर धरणातील पाणी सोडण्यात आले. मात्र, हे पाणी येवदा गावात शिरले. यावेळी शेतातून परत येणाऱ्या राहुल चंदूरकर याचा नदी किनाऱ्यावरुन पाय घसरल्याने तो नदीत बुडाला. सद्या त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक शोध घेत आहे. गावात पाणी शिरल्याने गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.