अमरावती - नवीन कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सार्वजनिक वाहतूक बंद आहे. गावात एस. टी. येत नसल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी (मांडवगड) येथील ६२ वर्षीय वृद्ध सायकलने २५ किलोमीटरचे अंतर कापून तहसिल कार्यालयात पोहोचले होते. काम करून पुन्हा ते सायकलने तेवढेच अंतर पार करत गावाला पोहोचले.
खरबी (मांडवगड) येथील ६२ वर्षीय शेतकरी गोपाळराव अर्जुन वाहने यांच्याकडे ३ एकर शेती आहे. त्यांना नुकतीच कर्जमाफी जाहीर झालेली आहे, तर नवीन कर्ज काढण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असून यासाठी नागरिक तहसिल कार्यालयात गर्दी करीत आहे. गोपाळराव वाहने यांनाही काही कागदपत्रे काढण्यासाठी चांदूर रेल्वे तहसिलमध्ये जाणे गरजेचे होते. परंतु, गावात एस. टी. बस नसल्यामुळे जावे तरी कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला. त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या सायकलने तहसिलमध्ये जाण्याचे ठरविले. गावातून २५ किलोमीटरचे अंतर त्यांनी अडीच तासांत पार केले. तहसिलमध्ये काम आटोपल्यानंतर पुन्हा २५ किलोमीटर अंतर कापत पुन्हा घरी पोहचले. वयाची साठी ओलांडली असतानाही ५० किलोमीटरचे अंतर ते ही जुन्या साध्या सायकलने यशस्वी कापल्याने अनेकजन आश्चर्य व्यक्त करीत आहे.