अमरावती- जिल्ह्यात आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसामुळे संत्र्याची गळती होत आहे. रविवारी अचलपूर तालुक्यातील दसापूर गावात शेतकऱ्यांनी संत्री गळतीची पाहणी करायला आलेल्या अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरत शेताबाहेरील रस्ता दाखवला. विविध रोगांनी झाडावरील संत्री मोठ्या प्रमाणावर गळून पडत आहेत. त्यामुळे संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदुर बाजार, तिवसा भागातील संत्री उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरवर्षी संत्री विक्रीच्या तोंडावर सर्व संत्री गळून पडत आहेत. मात्र, अधिकारी मात्र बांधावर जाऊन संत्री उत्पादकाची भेट घेत नाही त्यांना मार्गदर्शन करत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शनिवारी आमदार बच्चू कडू यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात ठिय्या मांडल्यानंतर रविवारी संत्री गळतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.
काय बोलले शेतकरी
संत्री गळती होते तेव्हाच फक्त तुम्ही शेतात येता, अनुदान मात्र भेटत नाही. संत्र्याची गळती झाल्यावर तुम्ही येता, तुमचे पगार बंद करायला पाहिजे, एक भेट देत नाही. तुम्ही फक्त शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर नेता, तुम्ही फोनही उचलत नाही. साहेब तुम्ही शेतात आले म्हणजे फार उपकार नाही केले नाही ते तुमचे कर्तव्य आहे. संत्री गळल्यावर इथे आलात. शेतकऱ्यांचा आत्मा तडफडत आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे एसी मध्ये बसता, अशा शब्दात एका शेतकऱ्याने संत्री पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाला धारेवर धरले. शेवटी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा रोष पाहून काढता पाय घेतला.