अमरावती - हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दीपाली यांची मेळघाटात 2014 पासून 2021 पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. आता त्यांना मेळघाटाबाहेर बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांनी 'संबंधितांना' (बदलीसाठी पैसे घेणारी यंत्रणा) पैसेही दिले होते. मात्र, पैसे देऊनही बदली होत नसल्याने त्या खचल्या होत्या, अशी माहिती दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पैसे दिल्याशिवाय बदली होतच नाही, हे काही आता लपविण्यासारखे नाही. पैसे दिल्यावरही बदली होत नसल्याने आम्ही पैसे परत मागितले होते. मात्र, तेही परत करण्यात आले नसल्याचे राजेश मोहिते यांनी सांगितले. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा रात्री-बेरात्री कर्मचाऱ्यांना जंगलात कॅम्पवर बोलवायचा, तिथे सर्व कर्मचाऱ्यांसमोर दीपालीवर रागावायचा. आम्ही याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र, ते सगळे एकाच माळेतील मणी असल्याने दीपालीच्या वेदना कुणालाही कळल्या नसल्याची भावना राजेश मोहिते यांनी व्यक्त केली.
शिवकुमार हा रेड्डीचा हस्तक
दीपालीच्या तक्रारीची दखल रेड्डी यांनी घेतली असती तर हा प्रसंग ओढावलाच नसता. मात्र, जंगलात अनेक प्रकारचा गैरकारभार चालतो. या गैरकारभारातला वाटा रेड्डीला मिळवून देणारा शिवकुमार हा मुख्य हस्तक होता, असेही राजेश म्हणाले.
दीपालीला कामासाठी मी प्रोत्साहन द्यायचो
आपण काही तरी हटके करावे, असे दीपाली यांना सतत वाटत होते. जंगलातील कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी त्या सक्षम होत्या. तीन गावांचे पुनर्वसन केल्यावर एकूण एक हजार कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी रक्कम देण्यासाठी सर्वांचे बँक खाते काढून देणे. शासनाकडून आलेला निधी कुठलीही चूक न होऊ देता प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचे जोखमीचे काम त्यांनी केले होते. मात्र, शिवकुमार हा विचित्र होता. हरिसाल गावाजवळ येताच कर्मचाऱ्यांना 10 मिनिटात संकुलावर भेटा, असे आदेश ऐन वेळेवर द्यायचा. शिवकुमार रात्री 10 वाजता कधी 11 वाजता सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवायचा. दीपाली प्रामाणिक असल्याने मी तिला तिच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचो. मात्र, हे असे काही होईल असे कधी वाटले नव्हते, असे राजेश म्हणाले.
वाहनचालक होता शिवकुमारचा खबऱ्या
दीपाली चव्हाण यांचा वाहनचालक हरिराम कासदेकर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारचा खबऱ्या होता. हरिसालच्या जंगलात आदिवासी कुठे तलावात मासे पकडायचे तेव्हा हरिराम कासदेकर त्यांना फुकटात मासोळ्या मागायचा. मासोळी दिली नाही तर जंगलात माशांची शिकार होते आहे आणि मॅडमांचे लक्ष नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी तो थेट शिवकुमारकडे करायचा. या वाहन चालकापासून दीपाली चव्हाण सावध होत्या. अनेकदा त्याला कुठे न्यायला टाळत, अशी माहितीही राजेश यांनी दिली.
दापोली येथे झाले शिक्षण
दीपाली चव्हाण यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे 2 ऑक्टोबर 1986 रोजी झाला होता. त्यांचे वडील दापोली येथी कृषी विद्यापीठात उपकुलसचिव होते. दीपाली यांनी बीएस्सी आणि एमएससीनंतर वनीकरण (फॉरेस्ट्री) विषयातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईला पेन्शन मिळायची. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपला स्वतःचा आर्थिक हातभार असावा, यासाठी दीपाली चव्हाण यांनी दापोली विद्यापीठात दैनिक वेतनिक म्हणूम काम केले. तसेच खासगी नोकरीही केली.
एमपीएससीच्या तयारीसाठी गाठले सातारा
दीपाली यांच्या मोठ्या बहिणीचे सासर सातारा असल्याने एमपीएससीच्या तयारीसाठी दीपाली यांनी आईसह सातारा शहर गाठले. 2011 मध्ये त्यांच्या भावाचे कर्करोगामुळे निधन झाल्याने दीपाली चव्हाण या आईसोबत सातारा येथे राहायला आल्या. दीपाली चव्हाण यांचे दीर नितेश मोहिते यांचे लग्न ठरले होते. 22 एप्रिलला घरी लग्न असल्याने मोहिते कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. दीपाली चव्हाण या लग्नाची तारीख निश्चित करायला घरी येऊन गेल्या. पत्रिकाही त्यांनी स्वतःच्या पसंतीने छापायला टाकल्या. घरी लग्न आल्याने आता एक दोन दिवसात त्या राजा घेण्याच्या विचारातही होत्या. मात्र, त्यानंतर हा प्रकार घडल्याचे राजेश यांनी सांगितले.
आता आणखी कुण्या दिपालीचा बळी जाऊ नये
माझी पत्नी या भ्रष्ट व्यवस्थेची बळी ठरली. असे असले तरी यापुढे कुण्या नव्या दीपालीचा असा बळी जाऊ नये. कोणत्याही खात्यात कोणत्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांनी समोर यावे, बोलावे असे आवाहन राजेश मोहिते यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले.