अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आताच आटोक्यात आले होते. त्यातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा नवा धोका उद्भवला आहे. यापार्श्वभूमीवर संचारबंदीचे शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून या नव्या आदेशाची अंमलबाजवणी केली जाणार आहे.
असे आहेत नवीन निर्बंध -
जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजतापर्यंत खुली राहणार आहेत. यामध्ये किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थ, कृषी सेवा केंद्र, बांधकाम आणि रेशन दुकान सुरू राहणार आहेत.
लग्नात फक्त 50 व्यक्तींना परवानगी -
लग्न सोहळ्यात फक्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या 50 व्यक्तीमध्येच केटरिंग आणि बॅण्ड पथकातील व्यक्तींचा समावेश राहणार आहे.
मैदानांना सकाळी 5 ते 9 पर्यंत परवानगी -
शहरातील क्रीडांगणे, मोकळी मैदाने तसेच उद्यानात फिरायला जाण्यास, व्यायाम करायला सकाळी 5 ते 9 वाजतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. खासगी बँक, विमा कार्यालय सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. तर शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही 50 टक्के राहणार आहे.
मास्क लावला नाही तर 750 रुपये दंड -
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाऱ्या व्यक्तींना 750 रुपयांचा दंड आकरला जाणार आहे. लग्न सोहळ्यातील नियमांचा भंग करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे 537 रुग्ण -
जिल्ह्यात रविवारी 35 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात सध्या 537 रुग्ण हे उपचाराधिन आहेत. जिल्ह्याचा बरे होण्याचा दर हा 97.82 आहे. तर मृत्यू दर हा 1.62 इतका आहे. अमरावती शहरात गृहविलगिकरणामध्ये 88 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात 221 रुग्ण गृहविलगिकरणात आहेत. 228 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.