अमरावती : अमेरिका, चीन जपान अशा जगातील सर्वच देशांमध्ये भारताला विकासाच्या उंच भरारीवर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा आज जगभरात होतेय. आज भारताचा सर्वच क्षेत्रात नरेंद्र मोदी यांच्यामुळे विकास होतोय. 2024 मध्ये देखील देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच सत्तेत येणार आहेत. यामुळेच सत्तेसोबत राहून आपल्या राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधता यावा, हाच उद्देश समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल (NCP leader MP Praful Patel) यांनी अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे रविवारी आयोजित केलेल्या नवचेतना महासभेत म्हटलंय.
अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य : राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी मनात कुठलाही संभ्रम बाळगण्याचं कारण नाहीय. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आम्ही सोडलेले नाहीत. सध्या सरकारमध्ये असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाहीय. येणाऱ्या निवडणुकीत देखील आपल्या पक्षावर आणि कार्यकर्त्यांवर उमेदवारी संदर्भात कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी अजित पवार घेत आहेत. तिन्ही पक्ष सर्व बाजूंनी सकारात्मक विचार करून आणि योग्य असा निर्णय घेतील. तिन्ही पक्ष राज्यातील सर्व घटकांसह महाराष्ट्राच्या हिताचाच निर्णय घेत आहेत. काळाची पावले ओळखून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे, असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. (Amravati Navchetna Mahasabha)
कॉंग्रेसमुळे विदर्भात मागे : काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर मात्र सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबतच हात मिळवणी केली. सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हा काँग्रेसचा गड मानून विदर्भात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला वाढण्याची संधीच दिली नाही. काँग्रेस सोबत गेल्यामुळेच आपण विदर्भात मागे राहिलो, असं खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel Navchetna Mahasabha) म्हणालेत. आता मात्र परिस्थिती बदललीय. मी स्वतः संपूर्ण विदर्भात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी बाहेर पडलोय. संपूर्ण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक बळकट आणि महत्त्वाचा पक्ष म्हणून तयार होईल, असा विश्वास देखील प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय.
अंबड येथील घटनेचा निषेध : जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान जो काही हिंसक प्रकार घडला, त्याबाबत अजित पवार यांनी खेद व्यक्त केलाय. या प्रकरणात जे कोणी संबंधित दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेत. अजित पवार हे गत दोन दिवसांपासून आजारी असल्यामुळे ते अंबडला जाऊ शकले नाही. याबाबत विरोधकांकडून उलटसुलट चर्चा पसरविल्या जात आहे. अशा चर्चांना काही अर्थ नाहीये. त्याकडे कोणी लक्ष देऊ नये, असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अमोल मिटकरींचा इशारा : आमचे नेते अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अतिशय आहे. या निर्णयानंतर पहिल्यांदाच पक्ष मोकळा श्वास घेतोय, असं आमदार अमोल मिटकरी नवचेतना महासभेला संबोधित करताना म्हणाले. सध्या आमच्या नेत्यांच्या निर्णयावर गल्लीबोळातील काही लोक टीका करीत आहे. पण आम्ही मात्र संयम बाळगून आहोत. मात्र, आमचा संयम जर सुटला तर या टुकार पोरांना त्यांची लायकी दाखवू असा इशारा देखील अमोल मिटकरी यांनी यावेळी दिलाय.
नवचेतना महासभेला प्रचंड प्रतिसाद : अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवचेतना महासभेला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. या महासभेच्या निमित्तानं संपूर्ण सभागृहात प्रचंड गर्दी उसळली होती. नवचेतना महासभेला खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, संतोष महात्मे, वसंत गुईखेडकर, सुरेखा ठाकरे हे प्रामुख्यानं उपस्थित होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : राष्ट्रवादी काँग्रेसची नवचेतना महासभा उधळून लावण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त होता. दंगा नियंत्रण पथक सांस्कृतिक भवनाच्या आवारात तैनात होतं. सभागृहाबाहेर आणि सभागृहाच्या आतमध्ये देखील पोलीस मोठ्या संख्येत तैनात होते.
हेही वाचा :