अमरावती 3000 Kilos Of Prasad : विदर्भाची कुलस्वामिनी आणि अमरावतीच्या ग्रामदैवत असणाऱ्या अंबादेवी आणि एकविरा देवीला सोमवारी (23 ऑक्टोबर) महाअष्टमीच्या पर्वावर 3 हजार111 किलोचा सुकामेव्याचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. अंबादेवी आणि एकविरा देवी आरती मंडळाच्यावतीनं या प्रसादाचं वितरण भाविकांना केलं जात आहे.
आरती मंडळाची 25 वर्षांची परंपरा : अंबादेवी आणि एकवीरा देवी मंदिरात रोज सकाळी आणि सायंकाळी आरतीसाठी येणाऱ्या भाविकांनी अंबादेवी, एकवीरा देवी आरती मंडळाची स्थापना करून 25 वर्षांपूर्वी 911 रुपयांचा सुकामेव्याचा प्रसाद पहिल्यांदा देवीला चढवून तो वितरित केला होता. तेव्हापासून आरती मंडळाची ही परंपरा सुरू झाली आहे. प्रसादामध्ये दरवर्षी वाढ होत गेली. चार वर्षांपासून सातत्याने 3 हजार 111 किलोचा सुकामेव्याचा प्रसाद आरती मंडळाच्या वतीनं महानवमीला वितरित केला जातो, अशी माहिती अंबादेवी आणि एकवीरा देवी आरती मंडळाचे पदाधिकारी अभय बापोरीकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
वर्गणीतून मिळते मदत : अंबादेवी आणि एकवीरा देवी आरती मंडळाच्या वतीनं महानवमीच्या पर्वावर 3 हजार 111 किलोचा सुकामेव्याच्या प्रसादासाठी भाविकांनी आपल्या परीने जी काही मदत देता येईल ती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं. अकरा रुपयांपासून ते अकरा हजार रुपयांपर्यंत अनेक भाविक या प्रसादासाठी आपले सहकार्य देतात. विदेशात असणारे देवीचे भक्तदेखील आम्हाला या प्रसादासाठी आर्थिक मदत करतात. आम्हाला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या घरापर्यंत आम्ही प्रसादाचे पाकीट पाठवतो. विदेशात देखील प्रसाद पाठविण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. आम्हाला मदत करणाऱ्या भाविकांना प्रसादाच्या पाकिटमध्ये महानवमीच्या दिवशी पहाटे देवीच्या चरणी पूजन केलेलं एक रुपयाचं नाणं प्रसादाच्या पाकिटात टाकून दिलं जातं. हे नाणं दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी भाविक वापरतात, अशी माहितीदेखील अभय बापोरीकर यांनी दिली.
अशी केली जाते तयारी : प्रसादासाठी अंबादेवी आणि एकवीरा देवी मंडळाच्या सदस्यांकडून येणारी वर्गणी तसंच भाविकांच्या वतीनं मिळणाऱ्या देणगीद्वारे पंधराशे किलो खारीक, आठशे किलो काजू ,दोनशे किलो बदाम, यासह किस्मिस,अक्रोड, अंजीर, जरदाळू, चारोळी, गोडंबी असा सर्व सुकामेवा सप्तमी आणि अष्टमीपर्यंत एकवीरा देवी मंदिर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात जमा केला जातो. अष्टमीच्या रात्री हा सर्व सुकामेवा एकत्रित केला जातो. आरती मंडळाचे सर्व सदस्य हा सुकामेवा एकत्रित केल्यावर तो सुमारे 40 ते 50 हजार प्लास्टिकच्या पाकीट मध्ये भरतात. यावर्षी आमचा मानस 3111 किलो सुकामेवा प्रसादाचा असला तरी त्यापेक्षा अधिक सुकामेवा आमच्याकडे जमा झाला असल्याची माहिती आरती मंडळाचे सदस्य अजय साळसकर यांनी दिली.
पहाटे देवीला चढविला जातो प्रसाद : संपूर्ण सुकामेवा एकत्रित केल्यावर त्यातील काजू, बदाम, चारोळी, गोडंबी, जरदाळू, खारीक असे सर्व साहित्यांचे स्वतंत्र ताट सजवून ते आरती मंडळाच्या वतीनं वाजत-गाजत अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या गाभाऱ्यात नऊ कन्यांच्या हाताने चढविले जातात. आज पहाटे देवीला हा प्रसाद चढवल्यावर पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या प्रसादाचे वितरण केले जात आहे.
प्रसादाचे दिवसभर वितरण : दरवर्षी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रसादाच्या वितरणाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी पहाटे चार वाजल्यापासूनच मंदिरात येणाऱ्या भाविकांना या प्रसादाचे वितरण केले जात आहे. आज दिवसभर मंदिर परिसरात या प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांसह अमरावती शहरातील सुमारे 20 ते 25 हजार भाविकांच्या घरापर्यंत हा प्रसाद पोहोचविला जातो, असंही अभय बापोरीकर म्हणाले.
हेही वाचा -
- Dasara Special Story : दसरा महोत्सवाच्या चित्त थरारक कवायतींसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सराव; 93 वर्षांपासूनची परंपरा कायम
- Hinglaj Mata Amravati : बलुचिस्तानमधून अमरावती जिल्ह्यात आली ज्वालामाता, हिंगलाजमाता म्हणून आहे प्रसिद्ध वाचा हा विशेष रिपोर्ट
- Shardiya Navratri 2022 : नवरात्रोत्सवासाठी अमरावती सज्ज; अंबादेवी-एकवीरा देवीच्या उत्सवाची तयारी झाली सुरू