अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. गुरुवारी त्यांना नागपूर येथून मुंबईच्या लिलावती रुग्णालयात हलविण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागातून सर्वसामान्य वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मी मरणाच्या दारातून परतले, असे भावनिक उद्गार काढत खासदार नवनीत राणा यांनी व्हिडिओद्वारे अमरावतीकरांशी संवाद साधला आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा तसेच त्यांचा मुलगा आणि मुलींसह सासू, सासरे, जाऊ, पुतण्या असे घरातील 9 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार रवी राणा यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरावतीत घरीच क्वारंटाइन असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना अस्वस्थ जाणवायला लागल्याने त्यांना मंगळवारी अमरावती येथून नागपूरला हलविण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथून मुंबईला रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले.
नागपूर ते मुंबई या 22 तासांच्या प्रवासानंतर खासदार नवनीत राणा यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना बरे वाटायला लागताच अतिदक्षता विभागातून सर्वसामान्य वॉर्ड मध्ये हलविण्यात आले. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी स्वतः व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. माझ्याबाबत सर्वांना असणारी काळजी आणि प्रेम यामुळे मी मरता मरता वाचले आहे.मला सर्वांसाठी आणखी बरेच चांगले काम करायचे आहे, अशा भावना राणा यांनी व्यक्त केल्या. देवाने लोकांचे चांगले काम करण्यासाठी मला परत पाठवले आहे. सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. बरी होऊन लवकरच परत येईन, असेही खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीकरांना उद्देशून म्हंटले आहे.